एनसीसी कॅडेट्सकडून प्रतीभानगर येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता आणि पुष्पचक्र अर्पण समारंभ
कोल्हापूर ( प्रतिनिधी )
कोल्हापूर येथील सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी यांच्या वतीने सामाजिक सेवा व समुदाय विकास उपक्रमांतर्गत प्रतीभानगर येथील हुतात्मा स्मारक व स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. यानंतर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
या उपक्रमात एकूण 325 एनसीसी कॅडेट्ससह बटालियनचे अधिकारी व प्रशिक्षकवर्ग, पीआय स्टाफ, गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर जीसीआय, असोसिएट एनसीसी ऑफिसर्स ए एन ओ आणि बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलावडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
हुतात्मा स्मारक परिसरातील कचरा हटविणे, पुतळ्यांची साफसफाई करणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अशी विविध कामे या मोहिमेदरम्यान करण्यात आली.
स्वच्छता मोहिमेनंतर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी पुष्पचक्र अर्पण (Wreath Laying) समारंभ पार पडला. यावेळी उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला श्रद्धांजली अर्पण केली.
या उपक्रमातून कॅडेट्समध्ये शिस्त, जबाबदारीची जाणीव, संघभावना, नेतृत्वगुण, सार्वजनिक मालमत्तेचा आदर आणि समाजासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची भावना दृढ झाली. एनसीसी च्या “एकता आणि शिस्त” या ब्रीदवाक्यानुसार युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी व नैतिक मूल्ये रुजवण्याचा हा उपक्रम ठरला.
